देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात; ३३ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर-नांदुरा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. आंध्रप्रदेशातील कडप्पा येथून शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसने उभ्या असलेल्या ट्रकमागे जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ३३ भाविक जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मलकापूर-नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडला. भाविकांची लक्झरी बस भरधाव वेगात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून आदळली.
अपघाताची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिक गंभीर असलेल्या १३ जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे देवदर्शनाला निघालेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या अपघाताची अधिक चौकशी करत आहेत.