पाच जण गाढ झोपेत असताना घरफोडी! दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश; तब्बल ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास, बीबीमध्ये खळबळ...
बीबी येथील रहिवासी वैभव खुशालराव नागरे (रा. बीबी, ता. लोणार) यांच्या घरी ही चोरी झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले.चोरट्यांनी कपाटातून १२ ग्रॅम वजनाची सुमारे ६० हजार रुपये किमतीची गहूमणी पोत तसेच १० ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची एकदाणी, असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सकाळी उठल्यानंतर उडाली खळबळ!
घरातील मंडळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाची तपासणी केली असता सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नागरे यांनी तातडीने बीबी पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. चोरीचा तपास करण्यासाठी बुलढाणा येथील श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कुटे पुढील तपास करीत आहेत.
चोरट्यांच्या धाडसाने नागरिकांमध्ये संताप
विशेष म्हणजे घरात तब्बल पाच जण झोपलेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून दागिने लंपास केले. त्यामुळे चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याची चर्चा परिसरात सुरू आहे. बीबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. घरातील पाच जण झोपेत असताना झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे बीबी परिसरात नेमकी सुरक्षा कुठे कमी पडतेय, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.