डोणगावात घरफोडी; १.७३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, परिसरात भीतीचे वातावरण....
Apr 14, 2026, 10:28 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ९ ते १३ एप्रिलदरम्यान घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा परिसरात राहणारे डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या विविध अंगठ्या, झुमके, रिंग, नथ तसेच सुमारे २० ग्रॅम वजनाचे गंठण यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारभावानुसार या सोन्याची किंमत अधिक असल्याचा दावा संबंधितांनी केला आहे.
या प्रकरणी डॉ. पातुरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय धिके करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, डोणगावात पुन्हा चोरट्यांची हालचाल वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.