कऱ्हाळे ले-आऊटमध्ये घरफोडी; देवघरातील सोन्या-चांदीचा ६५ हजारांचा ऐवज लंपास!
Nov 8, 2025, 11:10 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील कऱ्हाळे ले-आऊट परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ६५ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. देवघरातील दागदागिने आणि चांदीच्या मूर्तींचा समावेश या ऐवजात आहे.
वैभव विनोदराव देशपांडे (वय ४४, रा. कऱ्हाळे ले-आऊट) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण कुटुंबासह ते नागपूर येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या चुलत भावाने ऋषिकेश देशपांडे यांनी फोनवरून घरात चोरी झाल्याची माहिती दिली.
कुटुंब परत बुलढाण्यात आल्यानंतर घर तपासले असता, घरातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्या. यावेळी देवघरातील लक्ष्मी मातेच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस (किंमत १२ हजार रुपये), सोन्याची अंगठी (१२ हजार), चार चांदीच्या मूर्ती (१० हजार), चांदीचा लोटा (१० हजार), पूजेची दोन ताटे (१२,५०० रुपये), चांदीच्या वाट्या, दिवे आणि चमचा असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहर पोलीस तपास करीत आहेत.