घरफोडी! मोताळा तालुक्यातील
राजूरमध्ये चोरट्यांचा डल्ला! सोन्या चांदीचे दागिने दामटले.....

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राजूर येथे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख १२ हजार ४४६ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजूर येथील रहिवासी सुनील वसंत बेदरकर हे पत्नीसमवेत १३ जून रोजी संध्याकाळी भिवंडी येथे आपल्या मुलीला आणण्यासाठी गेले होते. त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
सुनील बेदरकर हे १९ जून रोजी सकाळी ६ वाजता घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटातील लॉकर उघडलेले असून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात २.५ ग्रॅमचे फॅन्सी डोरले (१५,९३० रुपये), ९ ग्रॅमचे फुटबॉल मनी (३०,२५० रुपये), १० ग्रॅमची चैन (३४,८०० रुपये), ५ ग्रॅमची कानसाखळी (१६,४६६ रुपये) आणि रोख रक्कम १५,००० रुपये यांचा समावेश असून एकूण नुकसान १ लाख १२ हजार ४४६ रुपयांचे आहे.
घटनेनंतर बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राजूरसह परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.