अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; 
शेतीसंबधित साहित्य केले लंपास ! 'साहेब' बळीराजाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको, शेतकऱ्यांची विनवणी.. 

 
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. देऊळगाव घुबे, मिसाळवाडी, भरोसा, कोनड या गावांमध्ये घरफोडीच्या तसेच शेतीसंबंधीत साहित्य चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, मिसाळवाडी येथून एकाच रात्री चार शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर तोट्या चोरी झाल्याची घटना आज २८ मेच्या सकाळी उघडकीस आली. शेतकऱ्यांनी ही बाब अंढेरा पोलीसांना कळवली असून शेतकऱ्यांच्या या तक्रारीकडे लक्ष देवून अज्ञात चोरट्याचा छडा लावावा अशी मागणी होत आहे.
 मिसाळवाडी येथील शेतकरी राजू मिसाळ यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या १२ तोट्या, नारायण गुरुजी यांच्या १३, भरत भगत यांचे १० तर सतीश भगत यांच्या स्प्रिंकलर मधील ९ तोट्या चोरी झाल्याचे सकाळी समजले. त्यांनतर संपूर्ण मिसाळवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटना चिंता वाढवणारी बाब असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले असून त्यांनी शेतातूनच अंढेरा पोलिसांशी संपर्क केला आणि सगळी हकीकत सांगितली.