बुलढाण्याच्या युवकाचा शिर्डीत दुर्दैवी मृत्यू! हॉटेलच्या छतावरून खाली कोसळला.. 

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शिर्डी येथील एका हॉटेलच्या छतावरून खाली कोसळल्याने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामधील शेंबा येथील २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. 
  शुभम सुभाष नारखेडे असे मृतक युवकाचे नाव आहे. शुभम हा शेंबा येथील रहिवासी असून शिर्डी येथे दर्शनासाठी गेला होता. तेथील एका हॉटेलच्या छतावर १३ जुलैच्या रात्री मित्रांसह त्याने पार्टी केली. रात्री काय झाले कुणास ठाऊक? सकाळी शुभम कोणालाच दिसून आला नाही. यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. रविवारी सकाळी हॉटेलच्या खाली पडलेल्या अवस्थेत तो दिसला. याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना कळविण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेतून शुभम याला दवाखान्यात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुभम नारखेडे हा हॉटेलच्या छतावरून खाली कसा पडला? या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनोत्तरीत आहे. त्याचा मृत्यू अपघाती की घात केल्याने झाला? असाही गंभीर सवाल घटनेतून उठतो.