बुलढाणा पोलिसांचा ‘रिव्हर्स स्ट्राईक’! जोरदार कमबॅक..! पोलिसांच्या ताब्यातून फरार आरोपी ६ तासांत जेरबंद; भुसावळमध्ये भावासह सापडला, बुलडाणा जिल्हा रुग्णालयाच्या संडास मधून झाला होता फरार..!
एसपी निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे ‘टीमवर्क’!
मलकापूर येथील म्हाडा कॉलनीतील प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (वय २०) हा MIDC दसरखेड पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात अटकेत होता. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आणण्यात आले होते. दरम्यान, पहाटे सुमारे ३ वाजता त्याने रुग्णालयातील टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांच्या कस्टडीतून पलायन केले. आरोपी फरार झाल्याचे लक्षात येताच पोलिस यंत्रणा कामाला लागली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. तपासादरम्यान आरोपीचा भाऊ तुफानसिंग सुरजसिंग बावरी (वय १९) हा त्याला पोलिसांच्या अटकेपासून वाचविण्यास मदत करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत दिपनगर, भुसावळ (जि. जळगाव) गाठले. तेथे प्रतापसिंग हा त्याचा भाऊ तुफानसिंग याच्यासोबत आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत दोघांचा संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या कारवाईत पोलिसांनी बजाज पल्सर मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी MIDC दसरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एसपी निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली ‘टीमवर्क’चा विजय!
आरोपी रुग्णालयातून पसार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यंत्रणेला वेगाने कामाला लावले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी समन्वयाने तपास करत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. परिणामी, फरार आरोपीचा सहा तासांत माग काढून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने पथकाने काम केले.
कारवाई पथकात PSI अविनाश जयभाये, HC दीपक लेकुरवाळे, HC चांद शेख, HC विजय पैठणे, HC गणेश पाटील, PC गजानन गोरले, PC निलेश राजपूत, TAW HC राजू आडवे आणि PC कैलास ठोंबरे यांचा सहभाग होता. आरोपी फरार झाल्याने निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यानंतर अवघ्या सहा तासांत आरोपीला शोधून काढण्याची पोलिसांची तत्परता, समन्वय आणि "टीमवर्क" यामुळे या कारवाईचे विशेष कौतुक होत आहे.