बुलढाणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; १० लाखांचे ५४ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत...
आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल हरवणे ही मोठी अडचण ठरत आहे. मात्र, हरवलेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलचा प्रभावी वापर करत बुलढाणा शहर पोलिसांनी ही कामगिरी यशस्वी केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड, CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, तसेच पोलीस अंमलदार युवराज शिंदे, दीपक चव्हाण, विनोद बोरे, मनोज सोनुने व महिला पोलीस अंमलदार मोहिनी चव्हाण यांच्या संयुक्त प्रयत्नातून मागील महिनाभरात ही कारवाई करण्यात आली.
या कालावधीत CEIR पोर्टलच्या माध्यमातून ३८ मोबाईल, तर तांत्रिक तपासाच्या आधारे १६ मोबाईल, असे एकूण ५४ विविध कंपन्यांचे मोबाईल संच शोधून काढण्यात आले. हस्तगत केलेले सर्व मोबाईल्स मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांना सुपूर्द करण्यात आले.
या मोबाईल वाटपाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी आदित्य सिंग व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
हरवलेली मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.