बुलडाणा LCB चे कामच भारी..! गुजरात मध्ये जाऊन बहाद्दराला पकडले; खामगावातील उच्चभ्रू वस्तीत केले होते मोठे कांड...
Feb 24, 2025, 11:32 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशाच्या काना-कोपऱ्यात आपल्या विविध कारवायांची छाप सोडणाऱ्या बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा एकदा गुजरातस्थित उधना (जि. सुरत) मध्ये 'ऑपरेशन बेडी' राबवून एका अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या त्याच्या ताब्यातून चोरीतील ४ लाख ५८ हजार ८०० रुपये किमतीचे सोन-चांदीचे दागिने जप्त केले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या विशेष मार्गदर्शनात व पोनि अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही जोरदार कामगिरी बजावत गांधीनगरमध्ये मातृतिर्थाची छाप सोडली.
गेल्या काळात खामगाव व शेगावमध्ये झालेल्या घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात. बी.बी. महामुनी यांनी उपरोक्त गुन्ह्यांचा सखोल तपास करुन गुन्ह्याची उकल
करत आरोपीचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोनि अशोक लांडे यांनी त्यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध तसेच गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
अमरावती परिक्षेत्रातच नाही, तर राज्य व देशभरात डंका असलेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अशोक लांडे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन व नेतृत्वात पथकाने खामगाव पोलिसांच्या अभिलेखावर दाखल असलेला पवण बाळकृष्ण अहीर (रा. सावजी ले-आऊट, खामगाव) यांच्या घरफोडीचा गुन्हा तपासावर घेतला. गोपनीय खबरे व तांत्रिक माहिती काढली असता, गुन्ह्यामध्ये उधना (जि. सुरत) येथील अट्टल चोरटा तेजपालसिंग निहालसिंग भाटिया (वय ३३ वर्षे) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक विश्प पानसरे यांनी आंतरराज्यीय तपासाचे सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर स्थागुशाचे पोनि अशोक लांडे, खामगाव शहरचे पोनि रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस अंमलदार एजाज खान, दिगंबर कपाटे, अजीज परसुवाले, चालक पोलीस अंमलदार शिवानंद हेलगे यांच्यासह खामगाव शहरचे पोउपनि राजेश गोमासे, पोलीस अंमलदार सागर भगत, निशांतकुमार, तांत्रिक विश्लेषक कैलास ठोंबरे, ऋषीकेश खंडेराव यांनी गुजरातस्थित उधना (जि. सुरत) गाठले. त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी तेजपालसिंग भाटीया याला बेड्या ठोकल्या सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या तेजपालसिंगला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली, तसेच उपरोक्त घरफोडीत लंपास केलेले ६० ग्रॅम सोने (किंमत ४ लाख ५० हजार रुपये), १०० ग्रॅम चांदी (किंमत ८ हजार रुपये), असा एकुन ४ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मध्यप्रदेशातील बलवानी (जि. बडवानी) येथून पथकाच्या स्वाधीन केला. त्यामुळे उपरोक्त गुन्हा उघडकीस आला.
असा करायचे कार्यक्रम...
आरोपी हा त्याच्या साथीदारांसह विविध शहरातील उच्चभ्रू वस्तीतीत बंद असलेल्या घरांची रेकी करतात. सदर घरांमध्ये कोणी राहत नसल्याची खात्री करतात. त्यानंतर रात्रीच्या दरम्यान बंद घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करतात. त्यानंतर घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य मौल्यवान वस्तू चोरुन पोबारा करतात.