बुलढाणा एलसीबीची दमदार कामगिरी! मलकापुरात एटीएम फोडणाऱ्या भामट्याला इंदौर मधून आणले उचलून....
मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये 15 जून 2026 रोजी पहाटे 3.36 वाजताच्या सुमारास ग्राम धानोरा येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये दोन अज्ञात इसमांनी प्रवेश करून लोखंडी रॉडच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात मशीनचे नुकसानही केले. याप्रकरणी फिर्यादी महेश कैलास बुरसे (वय 29, रा. पुरेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 125/2026 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे धाडसी कारवाई करत जावेद अयुब खान (वय 38, रा. कबूतरखाना, इंदौर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती आर्टिगा कार (क्र. MP-09-WB-3237) किंमत 5 लाख रुपये आणि एक मोबाईल फोन किंमत 5 हजार रुपये असा एकूण 5.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ. शेख चाँद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. गजानन गोरले, वैभव मगर, शिवानंद हेलगे, राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव यांच्या पथकाने केली