धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा अर्बनच्या कर्जदारास १ वर्षाचा साधा कारावास व धनादेशाची रक्कम रु.५ लाख फिर्यादी संस्थेला देण्याचा आदेश.
कर्जदार ज्ञानदेव गणपत शेळके रा. पेठ, ता. चिखली, जि. बुलडाणा यांनी बुलडाणा अर्बन को.ऑप. सोसा. बुलडाणा यांच्या डोंगरखंडाळा शाखेकडून रु.२० लाख चे वैयक्तिक कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड कर्जदार यांनी न केल्यामुळे कर्ज थकीत झाले. त्यानंतर संस्थेने कर्जदाराकडे थकीत कर्ज रक्कमेची मागणी केली असता, कर्जदार ज्ञानदेव गणपत शेळके यांनी बुलडाणा अर्बन संस्थेला आयसीआयसीआय बँक लि. शाखा-खामगांव चा रु.५,००,०००/- चा धनादेश थकीत कर्जाबद्दल दिला होता. तो त्यांचे खात्यात वटविण्याकरिता पाठविला असता, सदर धनादेश कर्जदार ज्ञानदेव गणपतं शेळके यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादरीत झाला. त्यामुळे बुलडाणा अर्बन पतसंस्थेतर्फे कर्ज अधिक्षक प्रशांत सुरेश कुळकर्णी यांनी आरोपी ज्ञानदेव गणपत शेळके यांचेवर कलम १३८ प्रमाणे मुख्यन्यायदंडाधिकारी, बुलडाणा यांचेकडे प्रकरण नं.४७०/२०१६ हे दाखल केले होते. या प्रकरणामध्ये कर्ज अधिक्षक प्रशांत कुळकर्णी यांची साक्ष व कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरुन अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी श्री. काळे साहेब कोर्ट नं.३ बुलडाणा यांनी आरोपी ज्ञानदेव गणपत शेळके यांना धनादेश अनादर प्रकरणी दि.९/२/२०२४ रोजी १ वर्षे साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व आरोपीने रु.५,००,०००/-ची नुकसान भरपाई म्हणून धनादेशाची रक्कम ३० दिवसाचे आत फिर्यादी बुलडाणा अर्बन संस्थेला देण्याचा आदेश पारीत केला, अशा प्रकारची शिक्षा सुनावली. सदर प्रकरण फिर्यादी संस्थेच्या वतीने अॅड. राजेश काशीकर यांनी साक्षी पुरावे तपासून व योग्य युक्तीवाद करुन कामकाज पाहिले.