BULDANA LIVE SPECIAL अंदर की बात! खामगावात नकली नोटांचे रॅकेट? प्रकरण दाबण्यासाठी कुणी केली देवाण - घेवाण? ठाणेदारांनी ठेवले कानावर हात, म्हणाले, "हे आमचे अंतर्गत वाद"! 
 

एसपी कडासनेंच्या तावडीतून "ते" तिघे सुटण्याची शक्यता नाहीच! प्रकरण खरे असल्याचा संशय येणारी काय आहेत कारणे,वाचा बातमीत...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एसपी सुनील कडासने यांच्या नेतृत्वात सध्या बुलडाणा जिल्हा पोलिस दलांच बर चालु आहे..कायदा - सुव्यवस्था यासोबतच गुन्हेगारांवर जरब बसवण्यात एसपी कडासने यांना चांगलेच यश आले आहे. काही गुन्हे कागदावर वाढल्याचे दिसत असले तरी त्या गुन्ह्यांचा होत असलेला वेगवान तपास ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. मात्र होत काय की जस एखाद्या चांगल्या आंब्याच्या पेटाऱ्यात दोन - तीन आंबे सडके निघतात तस कर्तुत्ववान जिल्हा पोलिस दलात काही ठिकाणी खाच खळगे आहेतच. काही दिवसाआधी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यातील ३ खादाड पोलीस कर्मचाऱ्यांना एसपी कडासने यांनी चांगलाच धडा शिकवला होता.  या तसल्या मोजक्या लोकांच्या कारनाम्यामुळे चांगल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांकडेही लोक चुकीच्या संशयातुन पाहतात. त्यामुळे तसल्या लोकांचा शोध घेऊन त्यावर वेळीच आवर घालण्याचे काम आता एसपी सुनील कडासने यांना करावे लागणार आहे. अर्थात हा सगळा मुद्दा इथ उपस्थित करण्याचं कारण आहे ते खामगावच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित "कथित" बनावट नोटा प्रकरणाचं...या प्रकरणाची जशी चर्चा आहे त्याप्रमाणे जर हे प्रकरण खरचं झालं असेल तर मात्र विषय गंभीर आहे..या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबधित दोषींवर कठोर कारवाई एसपी कडासने यांना करावी लागणार आहे...

  सुरू असलेल्या चर्चेनुसार प्रकरण १२ ते १५ दिवसाआधीचे आहे. "त्या" तीन पोलिस कर्मचाऱ्यांना एका घरात नकली नोटा असल्याची माहिती प्राप्त झाली. तिघांनी तिथे पोहचल्यावर कारवाई करणे किंवा वरिष्ठांना कळवणे अपेक्षित असताना तसे न करता त्यात मोठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याची चर्चा आहे. तडजोडीचा आकडा लाखांच्या पटीत असल्याची असल्याची चर्चा आहे. दरम्यान सगळ "पचवल्यानंतर"   ५ -६ दिवसांनी या प्रकरणाची बोंब झालीच.विषय एसपी सुनील कडासने यांच्यापर्यंत देखील पोहचला असून त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना चौकशीच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान या कथित नकली नोटा प्रकरणातील एक पोलिस कर्मचारी चांगलाच वादग्रस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले..

म्हणून संशय वाढतोय..!

सुरू असलेल्या चर्चेत तथ्य आहे असा संशय येण्यासही काही कारणे आहेत. खामगावात याआधीही बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. या कथित प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याशी तडजोड केली अशी चर्चा आहे त्या खामगावचे रहिवासी असलेल्या तिघांवर फेब्रुवारी २०२३ ला हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात बनावट नोटा देऊन महिलेची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल आहे. १ लाख रुपयांचे ३ लाख देतो असे आमिष खामगावच्या तिघा भामट्यांनी महिलेला दाखवले होते. महिला तब्बल १० लाख रुपये घेऊन त्यांच्याजवळ पोहचली होती. त्या भामट्यांनी ४० लाख रुपयांच्या नकली नोटा असलेली बॅग महिलेच्या ताब्यात देऊन पोबारा केला होता. नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
या प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्या  आरोपींच्या खामगाव येथील  घरातून ७५ लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि बनावट सोने जप्त केले होते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्यात देखील फेब्रुवारी २०२२ मध्ये खामगावच्या एकाविरुद्ध बनावट नोटा प्रकरणात गुन्हा दाखल आहे. ज्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे तो आरोपी सध्या चर्चेत असलेल्या कथित बनावट नोटा प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा आहे...


तर सत्य समोर येईल...

खामगावच्या या कथित नकली नोटा प्रकरण दाबण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा "आखो - देखा" पुरावा समोर येण्याची शक्यता नाही. मात्र एसपी सुनील कडासने यांच्या नेतृत्वात याआधी जिल्हा पोलिस दलाने कुठलाही पुरावा नसलेल्या अनेक गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. चंदनपुर हत्याकांड, अलीकडील येरळी पुलावर झालेला दरोडा, राहेरी पुलावरील लुटमार प्रकरण ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे पोलीस दलातील हे कथित अंतर्गत प्रकरण तपासासाठी आव्हानात्मक आहे असे नाही. या कथित प्रकरणात "त्या" घटनास्थळाकडे जाणारे सीसीटिव्ही फुटेज तपासासाठी सहाय्यक ठरू शकतात. ज्या आरोपींचा याआधी इतर जिल्ह्यातील नकली नोटा प्रकरणात समावेश आहे, ते आरोपी खामगाव शहरातीलच आहेत. त्यामुळे बनावट नोटांची वाहतूक खामगावातून झाल्याचे याआधीच समोर आले आहे. त्या आरोपींसोबत या कथित पोलीस कर्मचाऱ्यांचे काही संबंध आहेत का हेदेखील तपासण्याची गरज आहे..या प्रकरणात खर काय ते लवकर समोर आल तर चांगल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवरील संशयाचे ढग लवकर दुर होतील..अर्थात एसपी सुनील कडासने यांनी हे प्रकरण मनावर घेतलं तर यातील सोक्षमोक्ष लवकर लागेलच यात शंका नाही. दरम्यान याप्रकरणी "बुलडाणा लाइव्ह"ने संबधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना याप्रकरणाची विचारणा केली असता "आमच्याही कानावर आहे,पण ती कुणीतरी वावडी उठवलेली आहे..आमच्यात अंतर्गत वाद आहेत" असे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला..