BREAKING शेतीचा वाद विकोपाला केला! पुतण्याने काकाचा जीव घेतला; ट्रॅक्टरखाली चिरडले; धोत्रा भनगोजी येथील घटना
Jun 6, 2024, 19:22 IST
अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धोत्रा भणगोजी गावातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे. शेतीच्या वादातून पुतण्याने शेतात काकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केल्याची घटना आज ६ जूनच्या दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.
धोत्रा भणगोजी येथील रहिवासी जनार्दन तुकाराम जोशी (५५ वर्ष) असे मृतकाचे नाव असून समाधान उत्तम जोशी (३५ वर्ष) याच्याशी त्यांचे काका पुतण्याचे नाते होते. मागील ५ ते १० वर्षापासून दोघांचे शेतीच्या प्रकरणाचा वाद होता. दोघांचे शेत एकमेकांना लागून आहे. एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर असे काही हे प्रकरण दिसत आहे. अशी माहिती ठाणेदार सचिन पाटील यांनी दिली. शेतीच्या याच प्रकरणाचा वाद होत होता. दरम्यान, आज दुपारी जनार्दन जोशी शेतात हजर असताना त्यावेळी लागूनच असलेल्या शेतात पुतण्या समाधान ट्रॅक्टरवर होता. आधीपासूनचा जमिनीचा सुरू असलेला वाद यावेळी टोकाला गेला. पुतण्या समाधान याच्या मनात काकाचा काटा काढण्याचा कुविचार निर्माण झाला. ट्रॅक्टर काकाच्या शेतीच्या दिशेने नेवुन चक्क अंगावर घातला. भरधाव वेगाने जनार्दन जोशी यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेले. त्यामध्ये त्यांचा जागीच जीव गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. मृतकाच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. पुढील तपास अतिशय वेगाने सुरू असल्याचे ठाणेदार सचिन पाटील यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.