BREAKING युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी मागितली ५० हजारांची खंडणी? वाचा रेतीचे टिप्पर पेटवण्यामागची इन्साईड स्टोरी....
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,१८ ऑगस्टच्या रात्री इसरुळ येथे रेतीचे टिप्पर पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. टिप्पर नेमके कुणी पेटवले याबद्दलची माहिती समोर आली नव्हती..मात्र आता याबाबतीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. स्वतः संतापाच्या भरार टिप्पर मालकानेच टिप्पर पेटवून दिल्याचे समोर आले आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांच्यावर ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तशी रीतसर तक्रार अंढेरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून संतोष भुतेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
देऊळगाव घुबे येथील पंजाब दिनकर घुबे यांनी या प्रकरणाची तक्रार अंढेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार पंजाब घुबे यांच्याकडे टिप्पर आहे. त्या टिप्परने ते मुरूम, रेती वाहतूक करीत असतात. या टिप्परवर चालक म्हणून अमोल मुजूमले व हेल्पर म्हणून संतोष घुबे काम पाहतात. काल, १८ ऑगस्ट च्या रात्री चालक व हेल्पर रेती आणण्यासाठी चिंचखेड येथे गेले होते. चिंचखेड येथून रेती घेऊन परत येत असताना इसरुळ येथील पुलाजवळ ३ -४ लोकांनी टिप्पर वर अचानक दगडफेक केली. यात टिप्पर चे समोरील काच फुटले. चालक व हेल्पर यांनी टिप्पर न थांबवता तातडीने शेळगाव आटोळ गाठले.
तिथून चालकाने घडलेली हकीकत मालक पंजाब घुबे यांना फोनवरून सांगितली. पंजाब घूबे त्यावेळी देऊळगाव मही येथे होते. त्यांनी लगेच चालकाला टिप्पर पुन्हा इसरुळ येथे आणायला सांगितले. पंजाब घुबे हेदेखील देऊळगाव मही वरून इसरुळ येथे पोहचले.
५० हजारांची खंडणी?
दरम्यान टिप्पर मालक पंजाब घुबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या साथीदारांसह जेव्हा इसरुळ येथे पोहोचले तेव्हा तिथे संतोष भुतेकर, दिपक पुंगळे आणि लाला नामक कुणीतरी होते. त्यावेळी "तुला जर या रोडवर गाडी चालवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी ५० हजार रुपये द्यावे लागतील" असे भुतेकर टिप्पर मालकाला म्हणाले. त्यावर मी पैसे देऊ शकत नाही असे टिप्पर मालकाने म्हटले असता "तू जर पैसे दिले नाही तर गाडी कशी चालवतो ते बघतो" असे भुतेकर यांनी म्हटल्याचा दावा टिप्पर मालक घुबे यांनी तक्रारीत केला आहे. भुतेकर यांच्या बोलण्यामुळे संताप अनावर झाल्याने आपण स्वतःच स्वतःच्या मालकीचे टिप्पर जाळल्याचे पंजाब घुबे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून संतोष भुतेकर दीपक पुंगळे आणि लाला अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुतेकर यांनी आरोप फेटाळले..
दरम्यान संतोष भुतेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपण कोणतीही खंडणी मागितली नाही असे भुतेकर यांनी म्हटले आहे.