BREAKING सावधान..! पुढील २४ तासांत बुलडाणा जिल्ह्यात धो-धो पाऊस; काही ठिकाणी अतिमुसळधार सरींचा इशारा, आठवडाभर राहणार पावसाचा मुक्काम....सतर्कतेचा इशारा
भारत मौसम विज्ञान विभागाच्या प्रादेशिक मौसम केंद्र, नागपूर यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार, ७ आणि ८ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहणार असून काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ जुलै रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर १० ते १३ जुलै या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या काळात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
बुलडाण्यासह संपूर्ण विदर्भातही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.
संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबणे टाळावे तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे प्रशासनाने म्हटले आहे.