अंढेरा फाटा परिसरात धाडसी चोरी; २.४३ लाखांचा ऐवज केला लंपास; पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले घर चोरट्यांनी फोडले...

 
 अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात चोरट्यांनी हात साफ करीत 2.43 लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अंढेरा फाटा येथे राहणारे आणि बुलढाणा वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू कारभारी काकड (वय ३५) यांच्या घरात ही चोरी झाली.  
४ डिसेंबर रोजी फिर्यादी बुलढाणा येथे कामानिमित्त असताना गावातील राम राठोड यांनी फोनवर घरात चोरी झाल्याची माहिती दिली. तत्काळ घरी परतल्यानंतर घराचे पाठीमागील उघडे दार उचकटले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील रोख रक्कम व दागदागिने असा एकूण ₹२,४३,००० किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.चोरट्यांनी १ लाख ३० हजार रोख, ३ तोळे चांदीची चैन किंमत पाच हजार, ४ तोळे सोन्याची साखळी किंमत एक लाख, गॅस सिलेंडर व भांडी किंमत ८,००० असा ऐवज लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळावरून काही ठसे हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.गावात पोलीस स्टेशन असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी होणे हा सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“पोलीस स्टेशनच्या हद्दीतच चोरी होत असेल तर ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.
देऊळगाव राजा उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रुपेश शक्करगे, तसेच तपास अधिकारी दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे पुढील तपास करीत आहेत.