अमडापुर येथे धाडसी चोरी; घराचे कुलूप तोडून ४० हजारांची रोकड लंपास..

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अमडापुर येथील चिखली रोडवरील महादेव मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून दरवाजाचे तसेच कपाटाचे कुलूप तोडत सुमारे ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास खांडेभराड यांच्या घरात रविवारी रात्री सुमारे १.३० ते पहाटे ४.३० वाजेदरम्यान चोरट्यांनी भिंतीवरून चढून प्रवेश केला. घराच्या मागील बाजूचे तसेच दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. त्यानंतर कपाटाचे कुलूप फोडून त्यातील अंदाजे ४० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर घरातील कुलूप तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केल्यानंतर घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती तत्काळ अमडापूर पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस कर्मचारी चंद्रशेखर मुरडकर व बिट जमादार सुमरसिंह ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे महादेव मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.