कर्ज मंजुरीचे आमिष, कर्जदारांना २१ लाखांचा चुना; आरोपीविरुद्ध गुन्हा
कर्जाच्या नावावर मोठा घोटाळा; सात कर्जदारांची लाखोंची फसवणूक उघड...
Mar 10, 2026, 13:47 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत सात कर्जदारांची सुमारे २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद लतीफ मोहम्मद हनीफ (रा. चांदूर बिस्वा) यांच्यासह आणखी सहा जणांनी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केला होता. या प्रक्रियेत आरोपी अफरोज खान दिलावर खान (रा. चांदूर बिस्वा) याने मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क साधला होता.
यानंतर आर्थिक विकास महामंडळाकडून फिर्यादीसह सहा जणांना प्रत्येकी २ लाख ९८ हजार रुपये इतके कर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. मात्र आरोपीने विविध कारणे सांगत फिर्यादीसह इतर कर्जदारांकडून बँक खात्यातील रक्कम काढून घेत एकूण २० लाख ८६ हजार रुपये स्वतःकडे जमा करून घेतले. ही रक्कम मौलाना आझाद विकास महामंडळ, मुंबई येथील ‘मकदुम साहेब’ यांच्या हस्ते चांदूर बिस्वा येथे परत देण्यात येईल, असे आरोपीने सांगितले होते.
मात्र दीर्घकाळ उलटूनही कर्जदारांना रक्कम मिळाली नाही.
त्यामुळे फिर्यादीसह इतरांनी १३ जून २०२५ रोजी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.यानंतर नांदुरा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अफरोज खान दिलावर खान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४२०, ४६८, ४७१ व ४७३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. या प्रकारामुळे नांदुरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.