विहिरीत आढळला ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; दोन दिवसांपासून होते बेपत्ता, मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर येथील घटना
Jul 28, 2026, 10:06 IST
मोताळा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (२६ जुलै) सकाळी शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गोपाल गंगाराम गायकवाड (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल गायकवाड यांना दारूचे व्यसन होते तसेच ते काही काळापासून मनोरुग्णासारखे वागत असल्याचे सांगितले जाते. शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहीदास गायकवाड हा कोथळी शिवारातील गट क्रमांक १५ मधील शेतात गेला असता, शेतातील विहिरीत वडिलांचा मृतदेह तरंगताना त्याच्या निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.