बीड जिल्ह्यात गोदापात्रात बोट उलटली! बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन महिलांचा मृत्यू; अधिक मासानिमित्त गेल्या होत्या दर्शनासाठी...

 
 लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची बोट गोदावरी नदीत उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लोणार तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अधिकमास यात्रेसाठी राज्यातील अनेक भागातून गेलेल्या भाविकांची बोट गोदावरी नदीत अचानक उलटल्याने अनेक भाविक पाण्यात पडले. या अपघातात सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) व सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) या लोणार तालुक्यातील रहिवासी महिलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय

रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. या दुर्दैवी घटनेमुळे चिखला काकडसह बिबी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.