दगड उचलण्याच्या कारणावरून रक्तरंजित थरार! शेजाऱ्यांनी दाम्पत्यावर चाकूने केले सपासप वार; चिखली तालुक्यात खळबळ! असोला येथील घटना..

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंगणातील दगड उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच रक्तरंजित संघर्षात बदलला. चिखली तालुक्यातील आसोला बु. येथे शेजाऱ्यांनी दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १३ जुलै रोजी घडली. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जावेद शेख कादर (वय ५४, व्यवसाय – शेती, रा. आसोला बु.) हे आपल्या घराजवळ असताना अंगणातील दगड उचलण्याच्या कारणावरून त्यांचा शेजारी शेख दस्तगीर शेख आलमगीर व त्यांची पत्नी समीना बी दस्तगीर शेख यांच्याशी वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोघांनी संगनमताने शेख जावेद यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात शेख जावेद व त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर, गळ्यावर आणि उजव्या हातावर चाकूचे वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेतील दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार यांनी आरोपी शेख दस्तगीर शेख आलमगीर व समीना बी दस्तगीर शेख (रा. आसोला बु., ता. चिखली) यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक २३२/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.