बुलढाणा न्यायालयातच रक्तरंजित थरार; मेव्हण्याचा साळ्यावर चाकूहल्ला, परिसरात खळबळ..! मेव्हण्याच्या विरोधात साक्ष द्यायला आला होता साळा !
चाकू घेऊन आरोपी न्यायालयात घुसलाच कसा? सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...
May 4, 2026, 17:17 IST
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरात आज,४ मे च्या दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. साक्ष देण्यासाठी आलेल्या साक्षीदारावरच आरोपीने चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.१० वाजता न्यायालयाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. विष्णू भगवान तायडे (वय ६४) याने आपला साळा श्रीकृष्ण तिडके (वय ३६) याच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात तिडके जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेनंतर पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपी सकाळपासूनच स्वतःजवळ चाकू बाळगून असल्याची बाब समोर आली आहे.
या घटनेमागे कौटुंबिक वाद असल्याचे उघड झाले आहे. आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा न्यायालयात सुरू असून, त्याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी साळा न्यायालयात आला होता. चार वर्षांपूर्वी आरोपीच्या छळाला कंटाळून पत्नी व मुलांनी विष प्राशन केल्याची घटना घडली होती. यात मुलाचा मृत्यू झाला होता, तर पत्नी व मुलगी बचावल्या होत्या.
आज मुलीने न्यायालयात साक्ष दिल्यानंतर ती आपल्या मामासोबत बाहेर पडत असताना आरोपीने रागाच्या भरात हल्ला केल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही आरोपीने पत्नी व साळ्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची माहिती पुढे आली आहे.
या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी कडक करण्याची तसेच मेटल डिटेक्टरद्वारेच प्रवेश देण्याची मागणी होत आहे.