दिवाळीच्या धमाक्यात खामगावात रक्तरंजित राडा! फटाके फोडण्याच्या वादातून किराणा दुकानदारावर चाकूहल्ला; खामगाव तालुक्यातील जुनना येथील घटना...

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असतानाच खामगाव तालुक्यातील जनुना गावात रक्तरंजित प्रकार घडला आहे. फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे  रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाले. घराच्या पडद्यावर सुतळी बॉम्ब फेकल्याने सुरू झालेल्या वादातून किराणा दुकानदारावर चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संदीप हरमकर हे जखमी झाले असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जनुना येथील हनुमान मंदिराजवळ संदीप हरमकर यांचे साई किराणा दुकान आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री संदीप हरमकर हे दुकानात असताना गावातील सार्थक दिलीप उर्फ नाना भुसारी आणि त्याचा लहान भाऊ नंदन दिलीप उर्फ नाना भुसारी हे दुकानासमोर फटाके फोडत होते. याचदरम्यान सार्थकने पेटवलेला सुतळी बॉम्ब थेट हरमकर यांच्या घराच्या पडद्यावर फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे पडद्याने पेट घेतला आणि घरात धूर पसरला.

घरात धूर पसरल्याचे पाहून संदीप यांच्या पत्नी नम्रता हरमकर बाहेर आल्या. त्याचवेळी संदीप यांनी दुकानाबाहेर येत सार्थकला घरात सुतळी बॉम्ब का फेकला, असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सार्थकने 'जास्त बोलू नको, नाहीतर तुला चाकू खुपसेन', अशी धमकी दिल्याचे नम्रता यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वाद सुरू असतानाच नंदनने संदीप यांना मागून पकडले, तर सार्थकने जवळ असलेल्या चाकूने त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर वार केला. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पतीवर झालेल्या हल्ल्यानंतर नम्रता यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी जखमी संदीप यांना ऑटोने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय, खामगाव येथे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी नम्रता संदीप हरमकर (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारी व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज राठोड करीत आहेत.