मोताळा तालुक्यातील पोफळी येथे रक्तपात! किरकोळ वादातून ५ जण तरुणाच्या जीवावर उठले; लाठ्याकाठ्या हाणल्या, लोखंडी रॉडने मारहाण करून घेतला जीव...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील पोफळी शिवारात जुन्या वादाच्या कुरापतीतून एका ३२ वर्षीय तरुणाची लाठ्याकाठ्या आणि लोखंडी आसारीने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर (वय ३२, रा. पोफळी) असे मृताचे नाव आहे. अनिकेत आणि आरोपी हे एकाच गावातील असून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोफळी शिवारातील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात आरोपींनी अनिकेतला गाठले.
अमानुष मारहाण आणि मृत्यू
जुन्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी अनिकेतवर लाठ्याकाठ्या आणि लोखंडी आसारीने हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर आणि पायावर वर्मी घाव घातल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाच जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ विजय आमराव सुरडकर (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर, लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे, कृणाल जानराव सुरडकर, निलेश बाळ बोदडे, क्रिष्णा रमेश अंभोरे या आरोपींचा समावेश आहे.