रेशनचा काळाबाजार? काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या तांदुळाचा ट्रक पकडला! 

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): तांदळाचे ५४३ कट्टे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील भोनगाव फाट्याजवळील राधास्वामी गेट नजीक तांदळाचा ट्रक क्र. एम एच ३० बिडी २४९७ पकडण्यात आला. तसेच ट्रक चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुलाम सादिक गुलाम रुक्सार असे ट्रक चालकाचे नाव तर अली मोहम्मद अली (रा.अकोला ) असे त्याच्या सहकाऱ्याचे नाव आहे. तांदूळ कोठे घेऊन जात असल्याचे विचारणा केली असता, दोघांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली, अखेरीस ट्रक मधील तांदळाचा माल राशनचा असून संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील राहुल ट्रेडर्स येथून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. शेगाव पोलिसांनी पंचा समक्ष ट्रक मधील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या, पिवळ्या, बदामी अशा विविध रंगाच्या प्लास्टिक पोतडीमध्ये तांदळाचे ५० ते ५५ किलो वजनाची एकूण ५४३ कट्टे आढळून आले. या मालासह, ट्रक असा एकूण २८ लाख ८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी आणण्यात आला आहे. चौकशी अंती सदर तांदूळ शासकीय वितरण प्रणालीतील असेल तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कळाले आहे.