BIG NEWS : देऊळगावराजात कव्वाली कार्यक्रमात रक्तरंजित थरार! तलवारी चालल्या; दोन जणांचा खून, ७ जण जखमी!
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अन्वर शेख आणि नगरसेवक पतीच्या समर्थकाचा मृत्यू; जालना-संभाजीनगर येथे जखमींवर उपचार
या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अन्वर शेख (३८) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित नगरसेवक पतीच्या समर्थकाचा समावेश असल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीचे नाव आरिफ पठाण असल्याचे समजते.
कव्वालीतील बसण्यावरून वाद; दोन गट आमनेसामने
प्राप्त माहितीनुसार, देऊळगावराजा शहरात काल रात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना लहान मुलांच्या बसण्यावरून सुरुवातीला वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढत गेला.याच वादातून नगरसेवक अन्वर शेख आणि नगरसेवक पती आतिक शेख यांच्याशी संबंधित समर्थक आमनेसामने आल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळातच दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
तलवारी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला
हाणामारीदरम्यान तलवारी आणि धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अन्वर शेख आणि आरिफ पठाण यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.या हिंसक घटनेत सुमारे सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना पुढील उपचारासाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी देऊळगावराजात दाखल
घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी व्यक्ती आणि हत्येचे कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.