BIG BREAKING : जळगाव जामोदच्या 'सर कटी लाश' प्रकरणाने विधानसभेत खळबळ! रोहित पवारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले;
राजुरा शिवारात एप्रिल महिन्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडापासून वेगळा केलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जळगाव जामोद पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका पिता-पुत्राला अटक करून त्यांनीच स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा दावा केला होता. या तपासाचे मोठे यश मिळाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.
मात्र काही दिवसांतच या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली. ज्या मुलीच्या खुनाचा आरोप ठेवून पिता-पुत्राला अटक करण्यात आली होती, तीच तरुणी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि अटक करण्यात आलेल्या दोघांची तत्काळ सुटका करण्यात आली.
या गंभीर निष्काळजीपणानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार तसेच एलसीबीच्या तपास पथकातील चार कर्मचाऱ्यांसह एकूण सहा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. मात्र, राजुरा शिवारात सापडलेल्या अज्ञात तरुणीच्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम असून मूळ आरोपींचा शोध लागलेला नाही.
रोहित पवारांचा सवाल; फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
आज विधानसभेत आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला आहे, तसेच चुकीच्या तपासामुळे अटक झालेल्या निष्पाप पिता-पुत्रांना शासनाकडून मदत दिली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा प्रकार महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यावरच विषय संपणार नाही. ज्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच, जे निष्कासनास पात्र असतील त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात येईल.
AI तंत्रज्ञानाची मदत; १७०० बेपत्ता महिलांची तपासणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी आतापर्यंत राज्यातील सुमारे १७०० बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली आहे.त्यापैकी ७ महिलांचे चेहरे मृतदेहाशी जुळल्याचे प्राथमिक स्तरावर आढळून आले असून, त्या अनुषंगाने पुढील सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, विधानसभेत झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा जळगाव जामोदच्या 'सर कटी लाश' प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली असून, आता या गूढ हत्येचा उलगडा नेमका कधी होणार आणि दोषींवर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.