बुलढाण्यात IPL क्रिकेटवर सट्टेबाजी; दिल्ली - मुंबईच्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले..
Apr 14, 2025, 18:18 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या आयपीएल क्रिकेटचा हंगाम जोरात आहे. या हंगामात दरवर्षी अवैध सट्टेबाजांना उधाण येत असते..त्यामुळे अशा सट्टेबाजांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून असते. काही सट्टेबाज पोलिसांची नजर चुकवून त्यांचा धंदा जोरात चालवतात..मात्र कधी ना कधी अशाही सट्टेबाजांचा गेम फसतोच.. बुलढाणा शहरात अशाच दोन सट्टेबाजांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. काल,१३ एप्रिलच्या रात्री दिल्ली मुंबईचा सामना सुरू असताना बुलढाणा शहरातील संभाजी नगरात पोलिसांनी एक कारवाई केली आहे.
बुलढाणा शहरातील संभाजी नगरात असलेल्या एका घरात अवैध रित्या क्रिकेटवर हार– जितचा सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून जगदीश भोसले आणि रवी भोसले या दोघा भावांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३२ इंची एक एलइडी टिव्ही, एक एमआय आणि एक ओपो कंपनीचा असे दोन मोबाईल असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात या दोन्ही सट्टेबाजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, बुलढाण्याचे एसडीपीओ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व प्रभारी अधिकारी सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक लेकुरवाळे, एजाज खान, दिंगबर कपाटे, विजय पैठणे, गजानन गोरले, दिपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली...