गोमांस तस्करीचा पर्दाफाश; 15 किलो गोमांस जप्त, आरोपी अटकेत; अंढेरा पाेलिसांनी अमाेना चाैफुलीवर केली कारवाई; स्थानिक युवकांनी दिली पाेलिसांना माहिती..!
Updated: Sep 26, 2025, 17:46 IST
शेळगाव आटोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गोमांसाची अवैध तस्करी अमोना चौफुली येथे २६ सप्टेंबर राेजी सकाळी उघडकीस आली आहे. एका दुचाकीवरून गोमांस वाहतूक होत असल्याचा संशय स्थानिक युवकांना आला. त्यांनी संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्याकडे अंदाजे 15 किलो गोमांस आढळले. या घटनेची माहिती अंढेरा पोलिस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार रुपेश शंकरगे यांनी तात्काळ पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी कारवाई करून आरोपी शेख असलम शेख साडू (वय ५५, रा. बाजारपेठ, जाफ्राबाद) याला अटक केली.
स्थानिक युवकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकी क्रमांक एमएच २८ झेड ११४० वरून गोमांस घेऊन जात होता. युवकांनी पाठलाग करून चौफुली येथे त्याला पकडण्यात आले. त्यावेळी त्याने जनावराचे मांस असल्याचे कबूल केले. पोलिसांनी ताबडतोब आरोपीस अटक करून त्याच्याकडील गाठोड्यातील मांसाची पाहणी केली.
हे मांस अत्यंत अस्वच्छ व बेकायदेशीरपणे वाहतूक केले जात असल्याचे आढळले. या प्रकरणी अष्टविनायक देविदास मोरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ मधील कलम ३२४, तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(सी), व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.