"देवाला तरी घाबरा हो!" राजुरमध्ये मोहरम सवारीचे आभूषणे चोरीला! वहिद खा विरुध्द गुन्हा.. 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चोरी करताना, चोरट्याला स्वतः चे तरी भान हवे! चोरी करणे चुकीचे आहेच पण निदान देवाला तरी घाबरावं हो.. असे म्हणावे लागत आहे. कारण घटनाच तशी आहे. काल मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण पार पडला. संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही विविध ठिकाणी मोठ्या श्रद्धाभावनेने मोहरम साजरा झाला. परंतु, राजूर येथे आदल्या दिवशी थेट मोहरम सवारीचे आभूषणे चोरीला गेल्याची घटना घडली. 
 प्रकरणाची तक्रार शेख शकील शेख रशीद यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. राजूर येथील प्रभाग क्र. १ मध्ये मोहरमची सवारी आहे. तिथे मोठी मज्जिद असून खलील खान यासीन यांची खोली आहे. या खोलीतच सवारीचे आभूषणे ठेवण्यात आली होती. १६ जुलैच्या रात्री १० ते १७ जुलै सकाळी ७ वाजता या कालावधीत ती आभूषणे चोरी झाली. त्यामध्ये चांदीच्या वस्तूंपैकी दोन छत्र्या, पंजा असा एकूण ५० हजारांचा ऐवज लंपास झाला. वहिद खान जियाउल्ला खान असे चोरट्याचे नाव असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या विरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.