वाघजाळ येथे कारमधून ४.४५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई...
अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. वाघजाळ येथील राजेंद्र शिंबरे यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एमएच १९ एपी २७१५ क्रमांकाच्या मारुती सुझुकी व्हीडीआय कारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
या प्रकरणात योगेश गणेश गाडेकर (वय २८, रा. वाघजाळ), आकाश गाडेकर (वय २५, रा. वाघजाळ) व निलेश राठी (रा. खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश गाडेकर हा संबंधित वाहनाचा मालक असून निलेश राठी याच्यावर कथित पुरवठादार असल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी गुटखा आणि संबंधित कार असा एकूण ४ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालावरील लेबल तपासणीत तो गुजरात आणि मध्य प्रदेशातील उत्पादक कंपन्यांकडून तयार करण्यात आल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांचा पुरवठा व साठा करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी अक्षय भोपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू हे मानवी आरोग्यास घातक असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे संबंधितांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केले आहे. तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेऊन उत्पादक, वितरक व इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग तपासण्यात येणार असून संघटित गुन्हेगारी आणि अवैध आर्थिक फायद्याचे पुरावे आढळल्यास मकोका अंतर्गतही कारवाई करण्याबाबत तपास सुरू असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.