सैलानीत ‘बाब्या’ची अमावस्येला निर्घृण हत्या; तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा शहरातील शेख हाफिज शेख नफिज उर्फ ‘बाब्या’ (वय 38, रा. इंदिरानगर) याची सैलानी येथे अमावास्येनिमित्त झालेल्या यात्रेत धारदार चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून झालेल्या या खुनप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सैलानी बाबा दर्गा परिसरात घडली. अमावास्येनिमित्त सैलानीत नेहमीप्रमाणे यात्रा भरली होती. मृतक बाब्या देखील आपल्या साथीदारांसह यात्रेत आला होता. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केले. यात बाब्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत तिघांना अटक केली आहे. यामध्ये अलेक्स इनॉक जोसेफ उर्फ रोनी (रा. सैलानी),शेख सलमान शेख अश्फाक (रा. सैलानी), सय्यद वाजीत सय्यद राजू उर्फ वाजीत टोपी (रा. सैलानी) यांचा समावेश आहे.तिन्ही आरोपीविरुद्ध या तिघांविरोधात रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 146/2025 भा.दं.वि. (BNS) कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक शेख नफिज उर्फ बाब्या हा जेबकटारीसह मारहाणीच्या अनेक प्रकरणांत आरोपी होता. त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तडीपारही केले होते. तरीही तो  शहरात वावरत होता. त्याच्या खुनामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये दहशत पसरली आहे. प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलिस करीत आहेत.