जुन्या शेतरस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-काठीने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा, महिला जखमी

 
 शेगाव :( बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा ):शेतात जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या रस्त्याच्या कारणावरून दोन नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत कुऱ्हाड आणि काठीने मारहाण केल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना खातखेड शिवारा परिसरात १७ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंदा उन्हाळे या १७ ऑगस्ट रोजी सकाळी गट क्रमांक ११ मधील शेतात फवारणी करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी गावातील आरोपी अरुण उन्हाळे आणि त्यांचा मुलगा महेश उन्हाळे हे कुऱ्हाड व काठी घेऊन त्यांच्या दिशेने आले.जुन्या शेतरस्त्याच्या वापरावरून यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. वाद वाढताच आरोपींनी कुऱ्हाड व काठीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.जुन्या शेतरस्त्याचा वाद पुन्हा एकदा पेटल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांच्या वापरावरून निर्माण होणारे वाद किती गंभीर रूप धारण करू शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे.