नांदुऱ्यात तहसीलदारांवर हल्ला २४ तासांत आरोपीला पकडले ! ५ लाखांचा मुद्देमाल जप्त....

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा तहसील कार्यालयात तहसीलदारांवर झालेल्या धक्कादायक हल्ला प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व नांदुरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीकडून तब्बल ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२३ एप्रिल रोजी दुपारी तहसील कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना आरोपी समाधान भगवान मोरे (वय ५२, रा. समर्थ अशोकनगर, बुलढाणा) याने तहसीलदार अजितराव जंगम यांच्या कक्षात घुसून धक्काबुक्की, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही धमकावत दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सावखेडा हद्दीतील सवांगी परिसरात लपल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.
कारवाईदरम्यान आरोपीकडून किमती ट्रॅक्टर, रोकड व इतर साहित्य असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास नांदुरा पोलिसांकडून सुरू आहे.
या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिस दलाच्या तत्परतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले असून, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.