अवघ्या १५व्या वर्षी आयुष्याचा प्रवास थांबला; दहावीच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूने जळगाव जामोद हादरले, ‘जयश्री इतक्या टोकाला का पोहोचली?’ प्रश्न अनुत्तरित...

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जामोद शहरातील रामनगर परिसरात १९ सप्टेंबर रोजी घडली. जयश्री कडू अंभोरे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मूळची पळशी सुपो येथील असलेली जयश्री सध्या कुटुंबासह जळगाव जामोद शहरातील रामनगरमध्ये राहत होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

 

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पळशी सुपो येथे तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्रीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

अवघ्या १५व्या वर्षी असा टोकाचा निर्णय का?

दहावीचे शिक्षण, पुढील आयुष्याची स्वप्ने आणि उमेदीचे वय... अशा अवस्थेत एका मुलीचा मृत्यू होणे हा केवळ एका कुटुंबाचा दुःखद प्रसंग नाही, तर समाजासाठीही अंतर्मुख करणारा विषय आहे. मुलांच्या मनात नेमके काय सुरू आहे, त्यांच्या अडचणी ते कोणाशी बोलतात का, अभ्यासाचा ताण, कौटुंबिक किंवा सामाजिक दबाव, नातेसंबंध अथवा इतर कोणतीही समस्या ते मनात दडवून ठेवत नाहीत ना, याकडे पालक, शिक्षक आणि समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. जयश्रीच्या मृत्यूमागचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होईल; मात्र या घटनेने लहान मुलांच्या मनाशी संवाद साधण्याची आणि त्यांना ऐकून घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे.