आधी घशात दुखू लागलं..नंतर वाटलं ॲसिडिटी झाली..! दवाखान्यात नेतांनाच १९ वर्षीय साक्षीने सोडले प्राण! लोणार तालुक्यातील घटनेने हळहळ..

 
 लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.सकाळी झोपेतून उठल्यावर तिला घशात दुखू लागले..थोड्या वेळानंतर तिला ॲसिडिटी झाल्यासारखे वाटू लागले..अस्वस्थ वाटू लागल्याने तिला लोणार येथे उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच तिने प्राण सोडले..

आज ४ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली. दरम्यान सर्पदंशाने साक्षीचा मृत्यू झाल्याचे नंतर समोर आले. ज्या सापाने साक्षीला दंश केला तो साप शेजारच्या अंगणात आढळून आला. आज सकाळी झोपेतून उठल्यावर साक्षीला घशात दुखत होते, त्यानंतर तिला तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी होत असल्याचे वाटले. कुटुंबियांनी तिला लगेच लोणार येथे हलवले,मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने तिला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलवण्यात येत होते, मात्र त्याआधीच वाटेत तिचा मृत्यू झाला. इकडे कुटुंबीयांना शेजारच्या अंगणात विषारी साप आढळून आला, डॉक्टरांनी देखील झोपेतच सर्पदंश झाल्याने साक्षीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

 अतिशय मितभाषी आणि सोज्वळ स्वभावाची साक्षी सुलतानपूर येथे फार्मसी द्वितीय वर्षाला शिकत होती. तिच्या निधनाची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या साक्षीच्या या दुर्दैवी निधनाने हळहळ व्यक्त होत आहे..