पहाटे ४.३० वाजता पोलिसांचा धडाका! देऊळगाव साकर्षात गोमांस विक्रीचा भंडाफोड; १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघे गजाआड

 
मेहकर (अनिल मंजुळकर: बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव साकर्षा येथे आज (३० जुलै) पहाटे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कथित गोवंश हत्या व गोमांस विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत तब्बल १ क्विंटल २६ किलो गोमांस, चाकू, सुरे व मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ४३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर आणखी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत आज पहाटे देऊळगाव साकर्षा येथे धाड टाकण्यात आली. या कारवाईत शेख अफसर शेख वाहब आणि शेख रिजवान शेख गफार या दोघांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून १ क्विंटल २६ किलो गोमांस, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे चाकू, सुरे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (गोवंश हत्या प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

ही धाड सपोनि शरद माळी यांच्या नेतृत्वाखाली PSI जाधव, पोहेका काकड, पोहेका पवार, पोशि पाटोळे, पोशि अमोल अंभोरे, पोशि विशाल धोंडगे, पोशि विष्णू निकम तसेच LPC शिवकन्या यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, अवैध गोवंश हत्या व गोमांस विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून अशा अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.