मध्यरात्री १.३० वाजता रेतीचा टिप्पर पोलिसांच्या जाळ्यात! ५ ब्रास अवैध रेतीसह तब्बल २५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर-सुलतानपूर रोडवरील चिंचोली बोरे फाट्याजवळ कारवाई
मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हे पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना सुलतानपूरकडून मेहकरच्या दिशेने येणारा एमएच २८ बीबी २००२ क्रमांकाचा टिप्पर संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना गौण खनिज रेती वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला असून, वाहनाची अंदाजे किंमत २५ लाख रुपये, तर त्यामधील ५ ब्रास रेतीची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी विशाल गणेश दांदडे (२५) आणि प्रकाश बाबुराव जावळे (३२), दोघेही रा. देऊळगाव घुबे, ता. चिखली, जि. बुलडाणा, यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध कलम ३०३(२), ३(५) बीएनएस तसेच कलम २१(१)(२) खाण व खनिज (विकास व नियमन) अधिनियम १९५७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वाहन आणि रेती असा एकूण २५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.