शिवीगाळीचा जाब विचारणे पडले महागात! राजूरमध्ये शेजाऱ्याने पती-पत्नीवर चालवला चाकू; दोघे जखमी, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी...

 
 मोताळा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घराच्या अंगणात झाडू मारत असताना शेजाऱ्याने विनाकारण शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा जाब विचारणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाले. शेजाऱ्याने पती-पत्नीवर चाकूने वार करून दोघांनाही जखमी केल्याची घटना मोताळा तालुक्यातील राजूर येथे १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेख जमीर शेख गफार याच्याविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सइदाबी शेख निसार (२५, रा. राजूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी त्या घराच्या अंगणात झाडू मारत असताना शेजारी राहणाऱ्या शेख जमीर याने विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सइदाबी यांनी शिवीगाळ का करता, असा जाब विचारताच दोघांमध्ये वाद पेटला. त्यानंतर सइदाबी यांनी पती शेख निसार यांना बोलावून घेतले. मात्र, वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळला. शेख जमीर याने शेख निसार यांच्याशी झटापट करीत चाकूने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वार केला. एवढ्यावरच न थांबता सइदाबी यांच्या डाव्या मनगटावरही चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे, या घटनेची पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी शेख जमीर शेख गफार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.