संपाचा आणखी एक बळी!; ST कर्मचारी विशालचा मृत्यू

विष प्राशन केल्याने अकोल्यात सुरू होते उपचार; कुटुंबाचा आधार हरवला; जिल्ह्यातील आंदोलन चिघळण्याची शक्यता
 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव आगारातील यांत्रिकी विभागातील कर्मचारी विशाल प्रकाश अंबलकार (३२, रा. माटरगाव, ता. शेगाव) याने १६ नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, काल १७ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरासह जिल्ह्यात सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत ३७  एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात विशालच्या आत्महत्येची भर पडल्याने हा आकडा ३८ वर गेला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र या संपावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. ठिकठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला. खामगाव येथील यांत्रिकी विभागात सहायक पदावर असलेला विशालही या कामबंद आंदोलनात सहभागी होता. या संपाचे पुढे काय होईल? कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील का, या विवंचनेत विशालने १६ नोव्हेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास विष प्राशन केले होते. त्याला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काल रात्री ९ च्या सुमारास विशालने अखेरचा श्वास घेतला. विशालचे वयोवृद्ध वडील एसटी महामंडळातूनच रिटायर्ड झाले आहेत. वृद्ध आई, मजुरी करणारा लहाना भाऊ वैभव आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारी बहीण पूजा यांचा एकमेव कर्ता आधार विशालच होता. तुटपुंज्या पगारावर तो घर सांभाळत होता व बहिणीचे शिक्षण व आईवडिलांचे आजारपणही. बहिणीच्या लग्नाचीही जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र त्यापूर्वीच विशालने जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.