अतिवृष्टीचे आणखी एक बळी; कर्जबाजारीपणातून गुंजाळा येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !
Sep 27, 2025, 11:16 IST
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे हाल थांबता थांबत नाहीत. चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील संतोष शंकर केदार (वय २१) या युवा शेतकऱ्याने २६ सप्टेंबर रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची अतिवृष्टी, मागील वर्षीचे अपयशी पीक आणि महाराष्ट्र बँकेचे कर्ज यामुळे आलेल्या नैराश्याने संतोषने जीवनयात्रा संपवली, अशी प्राथमिक माहिती आहे.
संतोषने दुपारी दोन वाजताच्या सुमारास गावातील शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार चुलत भाऊ गणेश शंकर केदार यांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व गावकऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात आले. मात्र तोपर्यंत संतोषचा मृत्यू झाला होता.
संतोष हा मेहनती आणि प्रामाणिक शेतकरी कुटुंबातील होता. मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे त्याच्या शेतातील पीक वाया गेले होते. यावर्षी चांगल्या पावसाने पीक बहरात येत असतानाच दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा शेती उद्ध्वस्त केली. त्यातच बँक कर्जाचे ओझे वाढल्याने नैराश्यातून संतोषने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
या घटनेमुळे गुंजाळा परिसरात शोककळा पसरली असून गावकरी व शेतकरी बांधवांमध्ये संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.