संग्रामपूर तालुक्यात वाळू वाहतुकीने घेतला आणखी एक बळी; संग्रामपूर-वरवट बकाल मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू..!

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. संग्रामपूर ते वरवट बकाल मार्गावर २३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची केळीने भरलेल्या आयशर वाहनाशी धडक होऊन ही घटना घडली. या अपघातात दीपक प्रभातसिंग पवार (रा. जळगाव जामोद) हा व्यक्ती जागीच ठार झाला.

या दुर्घटनेनंतर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या मार्गावर खुलेआम अवैध वाळू वाहतूक सुरू असून, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.


 नागरिकांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर निर्धास्तपणे फिरत असून, प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळेच अशा अपघातांची मालिका सुरू असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार, उपनिरीक्षक जीवन सोनवणे आणि कर्मचारी तातडीने दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन जेसीबीच्या सहाय्याने केळीने भरलेला आयशर वाहन रस्त्याच्या कडेला लावण्यात आला. मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.


या अपघातामुळे तहसील कार्यालय आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयाच्या अभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. "कितीही अपघात झाले, कितीही जीव गेले तरीही अधिकारी निष्क्रियच राहतात," असा नागरिकांचा संताप व्यक्त झाला आहे.या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रवीण श्रीकृष्ण म्हसाळ (वय ४०, रा. माळी खेळ, जळगाव जामोद) यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कलम १६०(१), २८१, ३२४(५) भा.दं.सं. २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.