अंजनी बु. चे अख्खे कुटुंबच जेव्हा आत्महत्येचा इशारा देते..! असं काय घडलं त्या कुटुंबासोबत?

 
मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ग्रामपंचायतीमधील आजी-माजी अधिकाऱ्यांनी जागेचे बनावट कागदपत्रे तयार करत घरासमोरील रस्त्याची जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्याचा आरोप मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील समाधान पदमने यांनी केला. न्याय, मागण्यांसाठी सदर प्रकरणाचा मागील दहा वर्षापासून पाठपुरावा करीत असून वैतागलेल्या पदमने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कुटुंबासह सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. 
बनावट कागदपत्रे व खोट्या सह्या करत ग्रामपंचायतीने ८ जुलै २०१४ रोजी रेकॉर्डला घरासमोरील रस्त्याचा ठराव केला. त्यापूर्वी २८ मार्चला दस्ताऐवजांची बनावट केली होती. ग्रामपंचायतीने हा ठराव कशा पद्धतीने घडवून आणला? याची सखोल विचारपूस झाली पाहिजे. जागेचे सर्व अधिकृत दस्तऐवज माझ्याकडे आहेत. ते तपासून, ग्रामपंचायतच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. अशी मागणी मागील दहा वर्षांपासून समाधान पदमने करत आहेत.
यासाठी त्यांनी विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिझवले. आतापर्यंत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या, आंदोलने, उपोषण केली. सर्व चौकशी अहवाल व इतर कायदेशीर पुरावे असुन प्रशासनाला वेळोवेळी सादर केले आहे. मात्र, अजूनही प्रशासन कारवाई करण्यासाठी दिरंगाई असल्याचे दिसून येते. यातून माझे संपूर्ण कुटुंबीय हाताश झाले आहे असे समाधान पदमने यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, अशातच पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे निवेदन देऊन न्यायाची मागणी पदमने यांनी केली. प्रलंबित न्याय मागणीसाठी तीन दिवस उपोषण करणार असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा गंभीर इशारा समाधान पदमने यांनी दिला आहे.