मुलासोबतच्या किरकोळ वादाचा राग; १५ वर्षीय शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून विनयभंगाचा आरोप, मोताळ्यात गुन्हा दाखल!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा २२ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर एका मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून संबंधित मुलाचे वडील विजय सावळे यांनी त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुलीला रस्त्यात गाठल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, विजय सावळे यांनी ‘माझ्या मुलासोबत का वाद घातलास?’ असा जाब विचारत अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, ‘पुन्हा माझ्या मुलाच्या भानगडीत पडलीस तर सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचेही मुलीने पोलिसांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.घडलेला प्रकार मुलीने आपल्या आजीला सांगितल्यानंतर दोघी संबंधित व्यक्तीकडे गेल्या. त्यावेळीही विजय सावळे यांनी मुलगी आणि तिच्या आजीला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून २४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी विजय सावळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, २९६, ३५१ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) २०१२ मधील कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.