जुन्या वादातून थार गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; कोकलवाडीत थरारक प्रकार, तिघे गंभीर....
मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील इंद्रसिंह रामलालसिंह राजपूत (वय ४९) हे शेती व गिट्टी खदान व्यवसाय करतात. त्यांचा कोकलवाडी येथील रहिवासी रामेश्वर दादाराव भगत याच्याशी जुना वाद होता. इंद्रसिंह राजपूत हे नातेवाइकांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी कोकलवाडी येथे आले होते. हनुमान मंदिरासमोर ते अनिलसिंह पंचमसिंह राजपूत, प्रतापसिंह अरुणसिंह राजपूत, आतिषसिंह परमेश्वरसिंह राजपूत व रामसिंह मोहनसिंह राजपूत यांच्यासह उभे राहून संवाद साधत होते.
दरम्यान, सकाळी दहा वाजेच्या सुमारास आरोपी रामेश्वर भगत याने एमएच-५६-ए-८१११ क्रमांकाच्या महिंद्रा थार गाडीने वेगात येत सर्वांना जोरदार धडक दिली. या धडकेत सर्वजण दूर फेकले गेले. इंद्रसिंह राजपूत हे हातपंपाजवळ पडले. त्यानंतर आरोपीने पुन्हा त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्ये हातपंप आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेत इंद्रसिंह राजपूत यांच्या कमरेला, उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. तर रामसिंह राजपूत, आतिष राजपूत व प्रतापसिंह राजपूत हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, इंद्रसिंह राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी रामेश्वर भगत याच्याविरुद्ध जीवाने मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.