चिंताजनक! बुलडाणा जिल्ह्यात तरुणाईमध्ये मध्ये वाढतेय गुन्हेगारीचे क्रेझ! भाई, दादा, डॉन बनण्यासाठी खटाटोप! गेल्या महिन्यात जिल्ह्यात अटक झालेल्या २३९ आरोपींपैकी ५०% आरोपी १८ ते ३० वयोगटातील..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ही बातमी समाज मनाची चिंता वाढवणारी अशीच आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा युवाशक्तीचा देश आहे.. तरुणाईच्या शक्तीच्या भरवशावरच देशाची प्रगती होत असते..मात्र ज्या तरुणाईच्या हातात पुढील काळात सूत्रे येणार आहेत ती तरुणाई मात्र मोठ्या संख्येत गुन्हेगारीकडे वळत असल्याचे गंभीर चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्यात एकूण २३९ जणांना विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. त्यातील तरुणाईचा आकडा (१८ ते ४०) ७० टक्क्यांहून अधिक आहे.

 बुलढाणा जिल्हा पोलिसांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ मे ते ४ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २३९ जणांना अटक करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात या नोंदी आहेत..२३९ आरोपींपैकी २२६ पुरुष तर १३ महिला आहेत. यात सर्वाधिक चिंता वाढवणारी बाब ही की गुन्हेगारांमध्ये तरुणाईचा अधिक समावेश आहे..
अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींमध्ये १८ ते २५ या वयोगटातील तब्बल ७७ जणांचा समावेश आहे. २६ ते ३० या वयोगटातील ५० आरोपी, ३१ ते ३५ या गटातील ३० आरोपी आहेत. २३९ पैकी १५७ आरोपी हे १८ ते ३५ या गटातील आहेत. तरुणाईच्या व्याख्येत चाळीस वर्षाखालील वयाचा समावेश केला तर तर ही संख्या १८२ पर्यंत जाते.
४१ ते ७० या वयोगटात ५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ७० वर्षाच्या वरील केवळ २ आरोपी आहे.२३९ पैकी २३२ आरोपींना अटक तर ७ जणांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
भाऊ,दादा, डॉन...
गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये ४० वर्षाखालील आरोपींचा समावेश अधिक आहे. अमली पदार्थांची वाहतूक, विक्री, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये देखील तरुणाईचा समावेश अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. सोशल मीडियावरील गुंडांच्या रिल्स, महागडी जीवनशैली याच्या आहारी जाऊन तरुणाई मध्ये डॉन भाईगिरी करण्याची क्रेझ वाढत चालली आहे..