शेगाववरून दर्शन घेऊन घरी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मलकापूरजवळ भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू; मुक्ताईनगर तालुक्यावर शोककळा! अज्ञात वाहनाच्या धडकेने तिघांचाही दुर्दैवी अंत...

 
 मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाववरून संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन मोठ्या भक्तिभावाने घराकडे परतणाऱ्या तीन तरुणांचा प्रवास अखेरचा ठरला! घरी पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मलकापूर–नांदुरा मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल, १५ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मृत तिघेही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले आणि परेश सुरेश घुले अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीने शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर तिघेही आपल्या गावाकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मलकापूर–नांदुरा मार्गावरील पारखेड फाट्याच्या पुढे असलेल्या जिओ पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

क्षणात होत्याचे नव्हते झाले...

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वीच देवदर्शन करून आनंदाने घराकडे निघालेल्या तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धडक देणारे वाहन कोणते?

अपघाताला कारणीभूत ठरलेले वाहन अद्याप अज्ञात आहे. संबंधित वाहनाचा प्रकार, चालकाची ओळख आणि अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत अद्याप स्पष्टता नाही.

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा!

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेलेल्या या तिन्ही तरुणांना आपला हा प्रवास आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरेल, याची पुसटशीही कल्पना नसेल. दर्शन घेऊन घराकडे परतताना झालेल्या या भीषण अपघाताने तीन तरुणांचे आयुष्य अकाली संपुष्टात आले. या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त होत असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याची मागणी होत आहे.