“खरातांवर कारवाई झाली पण इतर बुवा बाबांचे काय ?” — प्रा. श्याम मानव यांचा सरकारला खडा सवाल! बुलढाण्यात पत्रकारांशी साधला संवाद! म्हणाले, एकनाथ शिंदेंचा सहभाग तपासा....

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी सरकारवर तीव्र टीका करत दुहेरी निकषांचा आरोप केला. “खरातांवर कारवाई झाली, मात्र धीरेंद्र शास्त्री, प्रदीप मिश्रा, बागेश्वर यांच्यावर का नाही?” असा सवाल उपस्थित करत बुवाबाजीला सरकारकडूनच प्रोत्साहन मिळत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
 अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभर ‘वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया’ हे अभियान राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने सोमवार, २० एप्रिल रोजी बुलढाण्यात प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्थानिक विश्राम भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
प्रा. मानव म्हणाले की, काँग्रेसच्या काळात बुवा-बाबांविरोधात एफआयआर दाखल करताना पोलिसांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र सध्याच्या काळात सरकारच्या संमतीशिवाय कारवाई होत नाही. “खरातसारख्या भोंदू बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातूनच सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
भाजप मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी खरात बाबाकडे पूजा केल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, यामुळेच प्रकरणाकडे लक्ष गेले आणि कारवाई झाली. मात्र धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा यांच्यावरही आरोप असून त्यांच्यावरही कारवाई करणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप करत प्रा. मानव म्हणाले की, या कायद्याचा प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणी गेल्या काही वर्षांत प्रभावीपणे झाली नाही. अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती, मात्र पुढील कार्यवाही रखडल्याचे त्यांनी नमूद केले.
“पूर्वी शंकरराव चव्हाण व विलासराव देशमुख यांसारखे मुख्यमंत्री स्वतः श्रद्धाळू असले तरी कायद्यापुढे कुणालाही सूट दिली नाही. तशीच कारवाई झाली असती, तर खरातसारखे प्रकार उद्भवले नसते,” असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणात अनेक लोक अडकले असून त्याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही प्रा. मानव यांनी केला.
रूपाली चाकणकर यांच्यावरही आरोप...
पत्रकार परिषदेत प्रा. मानव यांनी रूपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. खरात प्रकरणात आवाज उठवणाऱ्या एका पत्रकाराला त्यांनी फोन करून दम दिल्याचा दावा करत “आरोपीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हाच आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांचाही या प्रकरणात समावेश व्हायला हवा,” असे त्यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभागही तपासला जावा, अशी मागणी त्यांनी केली.खरात प्रकरणात शिंदे आणि चाकणकर यांच्याशी असलेली जवळीक हेही एक कारण असू शकते, असा संशय व्यक्त करत “याबाबतचा तपास पोलिसांनी सखोलपणे करावा,” असे प्रा. मानव यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, मराठवाडा संघटक किशोर वाघ, जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हाध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.