समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आयशरची अज्ञात वाहनाला धडक, चालक ठार...
Jan 20, 2026, 11:40 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या ग्राम शहापूर जवळील समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक २७४ येथे झालेल्या भीषण अपघातात आयशर वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाला.ही घटना १७ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर क्रमांक MH-25-JW-6878 या वाहनाचा चालक अजय सुभाष शर्मा (रा. विजय नगर, बसस्टॉपजवळ, सिडको, नाशिक) हा आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक बसली. या अपघातात चालक अजय शर्मा गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातात आयशर वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी अभय उमेश सोनार (व्यवसाय – ट्रान्सपोर्ट, रा. नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, ३२४(४) अन्वये मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.